औरंगाबाद : कचरा कोंडीतून मार्ग काढण्याकरिता प्रशासनाने कचरा संकलनाचे खासगीकरण करीत पी.गोपीनाथ रेड्डी या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. सध्या सहा प्रभागात या कंपनीचे कचरा संकलन सुरू आहे. आज सोमवारी दुसरा महिना संपत आल्यानंतरही गेल्या महिन्याचे वेतन अद्याप न मिळाल्याने प्रभाग क्रमांक 3 मधील वाहन चालक व कामगारांनी सकाळी सेंट्रल नाका परिसरात एकत्र येत सुमारे चार तास काम बंद आंदोलन केले.गेल्या वर्षभरापूर्वी शहरात मोठ्या प्रमाणावर कचराकोंडीची समस्या निर्माण झाली होती.
यातून मार्ग काढण्याकरिता प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या. यात कचरा संकलनाचे खासगीकरण करण्यात आले. संबंधित कचरा संकलनाचे काम बंगलोर येथील पी गोपीनाथ रेड्डी या कंपनीला देण्यात आले आहे. शहरातील एकूण नऊ प्रभागा पैकी प्रभाग क्रमांक 4,5,व 6 हे तीन प्रभाग वगळता इतर सहा प्रभागात संबंधित कंपनीच्या वतीने कचरा संकलन करण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यात अनेक वेळा कर्मचार्यांनी काम बंद करण्याचे प्रकार घडले आहेत. दरम्यान मे महिना संपत आल्यानंतरही गेल्या महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नसल्याने आज सोमवारी सकाळी 6 वाजता प्रभाग क्रमांक 3 मधील वाहन चालक व कामगारांनी सेंट्रल नाका येथे काम बंद आंदोलन केले. घनकचरा विभाग प्रमुख नंदकिशोर भोम्बे यांनी उद्या सायंकाळ पर्यंत वेतन मिळेल असे सांगितल्यानंतर 10 वाजेच्या सुमारास चालक व कामगारांनी आंदोलन मागे घेतले. सुमारे शंभर जणांनी या आंदोलनात सहभाग घेतला















